बीडच्या पाणीप्रश्नावर खा. बजरंग सोनवणे संसदेत आक्रमक; उजनीचे पाणी मांजरा धरणात आणण्याची मागणी
बीड, 28 मार्च (हिं.स.)। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्याच्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. सोलापूरच्या उजनी धरणातून मांजरा नदीमार्गे मांजरा धरणात पाणी आणण्याचा प्रकल्प तातडीने मार
बीडच्या पाणीप्रश्नावर खा. बजरंग सोनवणे संसदेत आक्रमक; उजनीचे पाणी मांजरा धरणात आणण्याची मागणी


बीड, 28 मार्च (हिं.स.)।

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्याच्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. सोलापूरच्या उजनी धरणातून मांजरा नदीमार्गे मांजरा धरणात पाणी आणण्याचा प्रकल्प तातडीने मार्गी लावून बीड जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याची आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली. निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे बळीराजा संकटात असल्याचे सांगताना सोनवणे यांनी शेतकरी हितासाठी भावनिक साद घातली. उजनीचे पाणी मांजरा धरणात आल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे मांडले. केवळ पाणीच नव्हे तर पीक विम्याची प्रलंबित रक्कम, हमीभावाने घेतलेल्या शेतीमालाचे रखडलेले पैसे आणि बँकांकडून कर्ज मिळण्यास होणारा विलंब यावर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. पात्र शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी मराठवाड्याच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला असून आता केंद्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande