
लातूर, 28 मार्च (हिं.स.)। मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा.नगरसेवकांशी समन्वय साधून स्वच्छता मोहिमेला गती देण्याची सुचना लातूर- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी लातूर महानगरपालिकेस देशपातळीवरचे बक्षीस मिळालेले होते. मात्र आता स्वच्छता विभागाकडून शहर स्वच्छतेला गती मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता विभागाने नगरसेवकांशी समन्वय साधून प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती द्यावी अशी सुचना करून यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा अहवाल तात्काळ देण्यात यावा असे निर्देश मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेतील दालनात मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन शहर स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त वसुधा फड, स्वच्छता प्रमुख रमाकांत पिडगे यांच्यासह प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने मान्सुनपुर्व स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. याहीवर्षी ही मोहिम वेळेत सुरु करावी असे सांगून शहरातील ज्या-ज्या भागामध्ये पावसामुळे नाल्या तुंबणे किंवा रस्त्यावर पाणी येऊन दुर्गंधी पसरणे या बाबी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणची नाले सफाई शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावी अशी सुचना करून ज्या ठिकाणी बांधकाम विभागाची गरज आहे त्या ठिकाणी त्यांच्याशी समन्वय साधून नाल्या तुंबू नये यासाठी आवश्यक असणारी काय कार्यवाही करावी लागते आणि त्यासाठी किती निधी अपेक्षीत आहे याबाबतचाही अहवाल स्वच्छता विभागाने आगामी आठ दिवसात द्यावा अशी सुचना देविदास काळे यांनी केली.
लातूर महानगरपालिकेने मागील काळात स्वच्छतेचे चांगले काम करून देशपातळीवरचे पारितोषक मिळविले होते, याची आठवण करून देत देविदास काळे यांनी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचे काम मनपाच्या स्वच्छता विभागाकडून होणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. शहरातील प्रत्येक प्रभागात असलेल्या प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहचावी अशी सुचना करुन घंटागाडीवर असणार्या चालकाचे व कर्मचार्यांचे संपर्क क्रमाक नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे सांगितले. प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमेचा अॅक्शन प्लॅन तयार करुन आगामी कांही दिवसात प्रत्येक प्रभागात ही मोहिम राबविण्यात यावी असे सांगून सदर मोहिम सुरु करण्यापुर्वी नगरसेवकांशी समन्वय साधून त्यांच्याही सुचनाचा या मोहिमीत समावेश करुन घ्यावा असे सुचीत केले. स्वच्छतेबाबत आलेल्या नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तात्काळ प्राधान्य द्यावे असे सांगून स्वच्छता विभागाचे काम अधिक गतीने होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत जेणे करून पुन्हा एकदा लातूर महानगरपालिकेला स्वच्छतेबाबत देशपातळीवरचे पारितोषक मिळेल असा विश्वास मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त वसुधा फड यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांनी सांगितलेल्या अडचणी सोडविण्यासाठी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही देविदास काळे यांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis