
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल यशस्वी झाले असून, महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाला (Accounts & Finance Department) प्रतिष्ठित ISO 9001:2015 हे जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांचे अचूक व्यवस्थापन, पारदर्शक कार्यपद्धती आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जलद सेवांची दखल घेऊन हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या तिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन त्याचप्रमाणे १०० दिवसांचा कृती आराखडा दृष्टीपथात ठेवुन या नामांकनाच्या अनुषंगाने लेखा विभागात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास महपौर सौ. कविता संतोष मुळे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा पाटील, पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, स. अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे यांच्यासह पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लेखा विभागातील कार्यालयीन रचना, झिरो पेंडन्सी अर्थात फाईल्सचा निपटारा, सहा गठे पध्दती, अभिलेखाचे वर्गीकरण, ई-ऑफिस, अत्याधुनिक अभिलेख कक्ष आणि अद्ययावत हिशोब ठेवण्याची पध्दत एकंदरीत कामाच्या पारदर्शकतेमुळे हे यश प्राप्त झाले आहे. प्रशासकीय सुधारणा करतांना पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेत वाढ केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis