
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)।
लग्न म्हटलं की थोडी धावपळ, थोडा गोंधळ आणि भरपूर आनंद असतोच. पण चांदूर रेल्वे येथे एका नवरदेवाने केलेल्या आगळ्यावेगळ्या हट्टामुळे लग्न सोहळाच चर्चेचा विषय ठरला. “शहराच्या प्रथम नागरिकाशिवाय माझं लग्न होणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत नवरदेव थेट नगर परिषदेत पोहोचल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि हास्याचे वातावरण निर्माण झाले.शेख ईशाद शेख इस्राईल (रा. मासोद, ता. कारंजा) यांचा विवाह सावंगी मग्रापुर येथील कैफिया आजमी मन्नान बेग यांच्यासोबत ठरला होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहुण्यांची गर्दी जमली होती; मात्र नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा या अद्याप मंडपात पोहोचल्या नव्हत्या. नगराध्यक्षांच्या आगमनाची वाट पाहून थकलेल्या नवरदेवाने अखेर अनोखा निर्णय घेतला. आपल्ले भाऊ डॉ. हनीफ हफिज शेख व इतर नातेवाईकांसह तो थेट नगर परिषद कार्यालयात दाखल झाला. “नगराध्यक्ष आमच्यासोबत आल्याशिवाय लग्न लावणार नाही,” असा हट्ट धरत तो कार्यालयातच ठाण मांडून बसला.विशेष म्हणजे, डॉ. हनीफ हफिज शेख हे नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांच्या पतींचे मित्र असल्याने वातावरण अधिकच रंगले. अचानक आलेल्या या ‘बारातीं’मुळे नगर परिषदेतही एकच खळबळ उडाली. कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांमध्ये या प्रकाराची चर्चा रंगली.शेवटी नवरदेवाचा आग्रह मान्य करत नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांनी आपली कामे बाजूला ठेवली आणि पती नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांच्यासह नवरदेवासोबत मंडपाकडे रवाना झाल्या. त्यानंतरच लग्न सोहळा पार पडला.या अनोख्या हट्टामुळे लग्नसोहळ्याला एक वेगळाच रंग चढला असून, “नगराध्यक्षांशिवाय लग्न नाही” ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी