
अमरावती, 28 मार्च (हिं.स.) | मेळघाटातील हरिसाल–बोरी मार्गावर सेमाड आणि बुरी दरम्यान निसर्गप्रेमींना एक दुर्मिळ आणि भावुक दृश्य पाहायला मिळाले. जंगल सफारी मार्गावर एका मादी अस्वलाने आपल्या लहान शावकांना पाठीवर बसवून प्रवास करताना पाहिल्याने उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मादी अस्वल सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतर शावकांना पाठीवर घेऊन शांतपणे पुढे जाताना दिसली. जंगलातील वन्यजीव सहसा सावधपणे वावरत असतात. मात्र आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी मादी अस्वलाने दाखवलेली काळजी आणि ममता या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून आली. हा दुर्मिळ क्षण निसर्गप्रेमी रोहित पाल यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेला हा प्रसंग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. वन्यजीवांमधील मादी आणि पिल्लांमधील नाते, तसेच जंगलातील संघर्षमय जीवनाचे वास्तव या दृश्यातून प्रकर्षाने समोर आले.
मेळघाट परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक दुर्मिळ वन्यजीव आढळतात. अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे या घटनेमुळे पर्यटक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली असून जंगलातील जीवन किती संवेदनशील आणि अनोखे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी