शिरजगाव मोझरी येथील जि.प. शाळेला अत्याधुनिक सोयी द्या; आ. राजेश वानखडे यांना निवेदन
अमरावती, 28 मार्च (हिं.स.) शिरजगाव मोझरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली आहे. या
शिरजगाव मोझरी येथील जि.प. शाळेला अत्याधुनिक सोयी द्या; शाळा व्यवस्थापन समितीचे आमदार राजेश वानखडे यांना निवेदन


अमरावती, 28 मार्च (हिं.स.)

शिरजगाव मोझरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांना लेखी निवेदन देण्यात आले.शिरजगाव मोझरी येथे जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा असून येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. सध्या शाळेत सुमारे १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आगामी शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची संख्या २५० पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वाढत्या पटसंख्येच्या तुलनेत शाळेत आवश्यक सोयी-सुविधांची कमतरता भासत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनात शाळेसाठी काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृह उभारण्यात यावे, किमान २५ संगणकांसह अद्ययावत संगणक कक्ष सुरू करण्यात यावा, तसेच शाळेतील सर्व सात वर्गांसाठी डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी सुसज्ज क्रीडांगण व व्यायामशाळा उभारावी, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्र बसवावे आणि शाळेकडे जाणाऱ्या सुमारे ५०० मीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश जौंजाळकर, उपाध्यक्षा धर्ती सोनटक्के, सदस्य जयश्री वाघ, सीमा देवघरे, संगीता अखंडे, दिपाली तायवाडे, पुनम कारमोरे, अमोल बेलसरे, मोहन देवघरे, विनोद गणेश, विनोद बालपांडे तसेच शिक्षण तज्ज्ञ शिवानी भिवगडे आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande