
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असून, आज झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट पुन्हा ताणले गेले आहे. जळगावच्या सराफ बाजारातही दरवाढीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
मागील महिन्यात घसरणीचा कल दिसून आल्यानंतर, गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 11,500 रुपयांची वाढ झाली आहे. शनिवार, 28 मार्च रोजी सोन्याच्या दरात आणखी 2,600 रुपयांची भर पडली. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा 1,50,380 रुपयांवर पोहोचला असून, तो पुन्हा दीड लाखांच्या पुढे गेला आहे.चांदीच्या दरातही वाढ कायम असून, आज 3,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे जीएसटीसह चांदीचा दर 2,39,990 रुपयांवर पोहोचला आहे.
दरातील या वाढीमुळे, अलीकडील घसरणीमुळे चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढताना दिसत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर