
पुणे, 29 मार्च (हिं.स.) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोच्या उन्हाळी वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे. संकेतस्थळावरील उपलब्ध वेळापत्रकानुसार, पुण्याहून यंदाच्या उन्हाळी हंगामात कोणतेही नवीन सेक्टर (शहराची सेवा) सुरू होणार नाही. हे जवळपास निश्चित आहे. केवळ एखाद्या मार्गावर सेवा वाढवणे अथवा कमी करणे, तसेच विमानाच्या वेळेत बदल करणे एवढाच बदल असणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातून पुणेकरांच्या पदरी निराशाच पडणार आहे. विमानतळ प्रशासन नेहमीप्रमाणे हंगाम सुरू होण्याआधी अधिकृतपणे हंगाम जाहीर करण्याची शक्यता आहे.
पुणे-बँकॉक विमानसेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सततच्या कमी प्रतिसादामुळे सेवा चालवणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नसल्याने कंपनीने पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात पुणे-बँकॉक सेवा रद्द केली. आता बँकॉकसाठी पुण्याहून केवळ ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ची सेवा सुरू आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु