
मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। जर्मन कार निर्माता स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही स्कोडा कोडियाक साठी रिकॉल जाहीर केला आहे. या रिकॉलमागे फ्रंट सीटच्या आतल्या फ्रेममध्ये आढळलेली तांत्रिक त्रुटी कारणीभूत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या दोषामुळे अपघाताच्या वेळी साइड एअरबॅगची कार्यक्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, एकूण 221 युनिट्स या समस्येमुळे प्रभावित झाल्या आहेत. या गाड्यांचे उत्पादन 10 मार्च ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले होते. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, फ्रंट सीटच्या आतल्या फ्रेमचा एक किनारा साइड एअरबॅग उघडताना त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे अपघाताच्या वेळी एअरबॅग योग्य प्रकारे संरक्षण देऊ शकणार नाही आणि प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो.
दरम्यान, स्कोडा ऑटोने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारतात या एसयूव्हीची दुसरी जनरेशन लॉन्च केली होती. या मॉडेलमध्ये 2.0 लिटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे. तसेच या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड ऑल व्हील ड्राइव्ह फीचरही देण्यात आले आहे.
सुरुवातीला ही एसयूव्ही तीन रो सीटिंग कन्फिगरेशनमध्ये आणि स्पोर्टलाइन व सिलेक्शन एल अँड के या ट्रिम्समध्ये उपलब्ध होती. नंतर कंपनीने लाउंज नावाचा दोन रो सीटिंग असलेला एंट्री लेव्हल ट्रिमही या लाइनअपमध्ये समाविष्ट केला. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत सुमारे 39.99 लाख रुपये ते 45.95 लाख रुपये दरम्यान आहे. या सेगमेंटमध्ये या गाडीचा थेट मुकाबला फोक्सवॅगन टायरॉन या मॉडेलशी होत आहे.
कंपनीने प्रभावित ग्राहकांना लवकरात लवकर अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून आवश्यक दुरुस्ती विनामूल्य केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule