मेळघाटात रेशनच्या गव्हात खडे-मातीचा भरणा; चौकशीची मागणी
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)। चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ गावात शासकीय रास्त भाव धान्य दुकानातून वितरित करण्यात आलेल्या गव्हाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च महिन्यात रेशनकार्डधारकांना देण्यात आलेल्या गव्हात मोठ्या प्रमाणावर खड
मेळघाटात रेशनच्या गव्हात खडे-मातीचा भरणा; काटकुंभमध्ये संताप, चौकशीची मागणी


अमरावती, 28 मार्च (हिं.स.)।

चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ गावात शासकीय रास्त भाव धान्य दुकानातून वितरित करण्यात आलेल्या गव्हाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च महिन्यात रेशनकार्डधारकांना देण्यात आलेल्या गव्हात मोठ्या प्रमाणावर खडे आणि माती आढळून आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त धान्य लाभार्थ्यांना देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच काटकुंभच्या सरपंच ललिता बेठेकर यांनी स्वतः गव्हाची पाहणी केली. पाहणीदरम्यान गव्हात धान्यापेक्षा खडे आणि मातीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. हा गहू दळल्यानंतर त्यापासून तयार होणाऱ्या पोळ्या खाण्यायोग्य राहत नसल्याचेही समोर आले. गव्हातील खडे आणि माती निवडून काढण्यासाठी महिलांना मोठा वेळ खर्च करावा लागत असून, तरीही धान्य पूर्णपणे स्वच्छ होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

मेळघाटासारख्या दुर्गम आदिवासी भागात शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या धान्यावर अनेक गरीब कुटुंबांचे पोषण अवलंबून असते. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे धान्य मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या धान्यामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा गहू वापरायचा की फेकून द्यायचा, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.

या प्रकरणाची दखल घेत सरपंच ललिता बेठेकर यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून तातडीने चौकशीची मागणी केली आहे. संबंधित रेशन दुकानातील साठा तपासून दोषींवर कारवाई करावी आणि लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता पुरवठा विभाग या प्रकरणात काय पावले उचलतो, याकडे काटकुंभ गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande