
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। नांदेड येथे घेण्यात आलेल्या बीएड सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ उडाला असून आयोजित करण्यात आलेली परिक्षा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आहे. सदरील परिक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक परिक्षा आयुक्तांनी कळविले आहे. दरम्यान सदरील परिक्षा रद्द करण्यात यावी व परिक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.
नांदेड तालुक्यातील बोंढार परिसरातील गुलजार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मराठवाडा ऑनलाइन परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात बीएड व सीएटी परिक्षा घेण्यात येणार होती. सदर परिक्षा केंद्रावर ४३० विद्यार्थी परिक्षा देणार होते. प्रशासनाच्या गैरव्यवस्थेमुळे हजारो विद्याथ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने शैक्षणिक नुकसान झाले होते. बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणारी ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा सकाळपासूनच अडचणीत सापडली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र केंद्रावर पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने अनेक विद्याथ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. तर काहींना तासन्तास उभे राहून प्रतीक्षा करावी लागली. परीक्षा केंद्रावर संगणकांची संख्या अपुरी होती. नियोजित विद्याथ्यांच्या तुलनेत कमी संगणक उपलब्ध असल्यामुळे अनेकांना लॉगिनच करता आले नाही. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू केली असताना इंटरनेट सेवा अचानक बंद पडली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis