
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)
तिवसा विधानसभा मतदारसंघातील भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावांच्या प्रादेशिक वाढीव पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रलंबित निधी तातडीने उपलब्ध करून देऊन योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जलजीवन मिशन अंतर्गत तिवसा विधानसभा मतदारसंघातील भातकुली व अमरावती तालुक्यात सुरू असलेल्या १०५ गावांच्या प्रादेशिक वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, राज्य जलजीवन मिशनचे अभियान संचालक रंगा नायक तसेच पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान योजनेची सद्यस्थिती, रखडलेली कामे आणि कंत्राटदारांची प्रलंबित देयके यावर सविस्तर चर्चा झाली. निधीअभावी कामांची गती मंदावल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही आमदार वानखडे यांनी केली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रलंबित देयके लवकरच अदा करून कामांना गती देण्याचे आश्वासन दिले. केंद्र शासनाकडून निधी मिळण्यात विलंब झाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र राज्य शासनाने स्वनिधीतून मागील वर्षी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले. सध्या सुमारे ११ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून तीही लवकरच निकाली काढली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर भातकुली व अमरावती तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांमधील हजारो नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार राजेश वानखडे यांनी मांडला प्रश्न आमदार राजेश वानखडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुचनेद्वारे या योजनेचा प्रश्न उपस्थित केला होता. तिवसा मतदारसंघातील ५२ गावे खारपाणपट्ट्यात असल्याने तेथील नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे प्रलंबित निधी तातडीने उपलब्ध करून योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
राजेश वानखडे [ आमदार ]
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी