धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामाला वेग
बीड, 28 मार्च (हिं.स.)। मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला आता मोठी गती येणार आहे. भारत सरकारच्या विकास धोरणानुसार प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचा सविस्तर
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामाला वेग


बीड, 28 मार्च (हिं.स.)।

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला आता मोठी गती येणार आहे. भारत सरकारच्या विकास धोरणानुसार प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हा नवीन रेल्वे मार्ग प्रादेशिक आणि आर्थिक दृष्टीने जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून औद्योगिक तसेच व्यावसायिक कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होईल. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांमधील अंतर कमी होऊन शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पर्यायाने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्यातील केज, बीड आणि गेवराई या तीन तालुक्यातील काही गावांमधील खाजगी जमीन संपादित केली जाणार आहे. याशिवाय रेल्वे मार्गाच्या काही भागात वनविभागाची जमीन, राष्ट्रीय महामार्ग आणि कॅनॉलचे क्षेत्र येत असल्याने त्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या मार्गात तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून ना हरकत प्रमाणपत्रे देण्याबाबत या वेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

रेल्वे मार्गाचा सर्वे अधिक अचूक आणि जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभाग आणि संबंधित यंत्रणांची एक एकत्रित टीम तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या सक्रिय पुढाकारामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता कागदावरून प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वेगवान पावले टाकत आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास बीड जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात ही एक मोठी क्रांती ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande