
ढाका, 28 मार्च (हिं.स.) बांगलादेशने आयपीएल २०२६ च्या प्रसारणासाठी दार उघडले आहे. नवीन सरकारने अलीकडेच मुस्तफिजुर रहमान वादामुळे लादलेली आयपीएल प्रसारणावरील बंदी मागे घेतली आहे. नवनियुक्त माहिती आणि प्रसारण मंत्री झहिरुद्दीन स्वपन यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये आगामी आयपीएलच्या प्रसारणावर कोणतीही बंदी नाही. वास्तविक पाहता, बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून मुक्त करण्याच्या निर्णयामुळे सुमारे तीन महिन्यांपूर्वी बांगलादेश सरकारने देशात आयपीएलच्या प्रसारण आणि प्रसिद्धीवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती.
झहीर उद्दीन स्वपन म्हणाले, आयपीएलच्या प्रसारणासाठी आमच्याकडे कोणीही अर्ज केलेला नाही. आम्हाला राजकारण आणि खेळ यांची सरमिसळ करायची नाही. आम्ही याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू. जर कोणत्याही वाहिनीने आयपीएल प्रसारित करण्यासाठी अर्ज केला, तर आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू. यापूर्वी, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री अमीनुल हक यांनी सांगितले होते की, मागील अंतरिम सरकारने घातलेल्या बंदीनंतर ते आयपीएल प्रसारणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतील.
स्वप्न यांनी म्हटले की, आम्ही कोणालाही प्रसारण करण्यापासून थांबवणार नाही. जर स्टार स्पोर्ट्सला प्रसारण करायचे असेल, तर ते करू शकतात. जर आमच्या कोणत्याही चॅनलला प्रसारण करायचे असेल, तर आम्ही ते सकारात्मकतेने घेऊ, पण आम्ही कोणावरही सक्ती करणार नाही. बांगलादेश केबल ऑपरेटर्स असोसिएशनचे कार्यालयीन सचिव रेझाउल करीम लब्लू म्हणाले की, ते स्टार स्पोर्ट्सला आयपीएलचे प्रसारण करण्यापासून थांबवणार नाहीत, कारण त्यांना या संदर्भात कोणतेही सरकारी निर्देश मिळालेले नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे