
मुंबई, 28 मार्च (हिं.स.)क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे संघर्ष करत असलेला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ रविवारी आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना करणार आहे. कागदावर आणि आकडेवारीनुसार मुंबईचा संघ मजबूत दिसत असला तरी, टी२० हा असा खेळ आहे की कोणत्याही एका संघाला स्पष्ट दावेदार ठरवणे महागात पडू शकते. मुंबई आणि कोलकाता दोन्ही संघ गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलच्या १९व्या हंगामाची तयारी करत आहेत आणि वानखेडे स्टेडियमवर कोणता संघ आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मुंबई इंडियन्सने २०१३ ते २०२० दरम्यान पाच वेळा विजेतेपद पटकावले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांना विजेतेपद मिळालेले नाही. यावेळी, ते आपले सहावे विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवतील आणि दमदार सुरुवात करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. गेल्या वर्षी, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्सकडून पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या स्थानावर राहिला होता. पण यावेळी मुंबई इंडियन्स पूर्णपणे तयार आहे.
रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतण्यासाठी उत्सुक असेल. रोहित व्यतिरिक्त, त्याच्या संघात भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव, पांड्या, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक स्टार क्रिकेटपटू आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात रायन रिकल्टन, शेर्फेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर, विल जॅक्स, ए.एम. गझनफर आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह अनेक प्रभावी परदेशी क्रिकेटपटूही आहेत.बुमराह आणि बोल्ट यांची जोडी धोकादायक ठरू शकते. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांच्या रूपाने मुंबई इंडियन्सकडे दोन अनुभवी भारतीय गोलंदाज आहेत, तर नमन धीर पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करेल, जी भूमिका त्याने गेल्या वर्षी पूर्णपणे सार्थ ठरवली होती.
मुंबईसमोरील सर्वात मोठे आव्हान प्लेइंग इलेव्हनमध्ये योग्य संयोजन शोधणे हे असेल. संघ सुरुवातीचे काही सामने जिंकण्यासाठी कटिबद्ध असेल, कारण अनेकदा मिळालेल्या चांगल्या सुरुवातीनंतर त्यांना आपली लय कायम ठेवण्यात अपयश आले आहे. मुंबईत खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा अंगक्रिश रघुवंशी यांसारखे काही स्थानिक क्रिकेटपटू असतील पण त्यांचा गोलंदाजीचा मारा कमकुवत दिसत आहे, आणि मुंबई इंडियन्स याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
लिलावात केकेआरचा गोलंदाजीचा मारा आश्वासक वाटत होता, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्देशांनुसार, फ्रँचायझीने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळले. आकाश दीप आणि हर्षित राणा हे दोन भारतीय वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी प्रतिभावान आहे, परंतु तो दबावाखाली असू शकतो. परिणामी, टी-२० विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजी विभागाची मोठी जबाबदारी असेल. केकेआर संघात सीएसकेचे दोन माजी क्रिकेटपटू, रचिन रवींद्र आणि मथिशा पाथिराना यांचाही समावेश आहे. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून टिम सायफर्ट हा एकमेव सलामीचा पर्याय आहे, तर त्यांच्याकडे कॅमेरॉन ग्रीन आणि सुनील नरेन यांच्या रूपात दोन उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूही आहेत. त्याचबरोबर, संघात फिन ॲलनच्या रूपात एक चांगला फलंदाजही आहे.
पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात आतापर्यंत ३५ सामने झाले असून, त्यात मुंबई इंडियन्सचे पारडे जड राहिले आहे. मुंबईने या संघाविरुद्ध २४ सामने जिंकले, तर केकेआरने केवळ ११ सामने जिंकले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे