
मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। शेअर बाजारात साधारणपणे दर आठवड्याला नवीन कंपन्या आपला आयपीओ घेऊन येत असतात, मात्र येत्या आठवड्यात एकही नवीन आयपीओ बाजारात येणार नाही. तरीही गुंतवणूकदारांसाठी संधी संपलेली नाही, कारण आधीच सुरू झालेले दोन आयपीओ अजूनही सबस्क्रिप्शनसाठी खुले आहेत. यामध्ये विविड इलेक्ट्रोमेक आणि एमिएक टेक्नॉलॉजीज या दोन कंपन्यांचा समावेश आहे आणि हे दोन्ही आयपीओ एसएमई कॅटेगरीतील आहेत.
विविड इलेक्ट्रोमेकचा आयपीओ २५ मार्च रोजी ओपन झाला असून तो ३० मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या आयपीओसाठी प्राइस बँड ५२८ ते ५५५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान २४० शेअर्सचा लॉट घ्यावा लागणार असून त्यानंतर त्याच प्रमाणात गुंतवणूक वाढवता येईल. सध्या या आयपीओला ०.६१ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच जीएमपी सध्या शून्यावर आहे, त्यामुळे लिस्टिंगबाबत स्पष्ट संकेत मिळत नसले तरी अंतिम दिवसांमध्ये त्यात बदल होऊ शकतो.
दुसरीकडे एमिएक टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २७ मार्च रोजी ओपन झाला असून तो ८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या आयपीओचा प्राइस बँड ९३ ते ९८ रुपये आहे. यामध्ये किमान १२०० शेअर्सचा लॉट साइज ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत या आयपीओला केवळ ०.११ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कंपनीचाही जीएमपी सध्या शून्य असल्याचे दिसून येते.
एकंदरीत पाहता, पुढील आठवड्यात नवीन आयपीओ नसले तरी सध्या सुरू असलेल्या या दोन आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मात्र सबस्क्रिप्शन आणि जीएमपी दोन्ही बाबतीत प्रतिसाद कमी असल्याने गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule