
मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। सुझुकी मोटरसायकल इंडिया ही दुचाकी उत्पादक कंपनी येत्या 2 एप्रिल रोजी आपला 2026 सुझुकी बर्गमन स्ट्रीट स्कूटर भारतीय बाजारात लाँच करणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने एक टीझर प्रसिद्ध केला असून त्यामध्ये स्कूटरच्या हेडलॅम्पची झलक पाहायला मिळते. या टीझरवरून ही बर्गमन स्ट्रीटची पुढील जनरेशन आवृत्ती असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 2018 पासून विक्रीसाठी उपलब्ध असलेली बर्गमन स्ट्रीट 125 सीसी सेगमेंटमध्ये सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक ठरली आहे.
नवीन 2026 बर्गमन स्ट्रीटच्या डिझाईनमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार असून टीझरमध्ये स्प्लिट हेडलॅम्प लेआउट दाखवण्यात आला आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत हा लूक पूर्णपणे वेगळा असून आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध मोठ्या बर्गमन मॉडेल्सपासून प्रेरणा घेतल्याचे दिसते. त्यामुळे स्कूटरला अधिक प्रीमियम आणि मॉडर्न लूक मिळण्याची शक्यता आहे.
तांत्रिक तपशीलांबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरी नवीन बर्गमन स्ट्रीटमध्ये सुझुकी ॲक्सेस 125 मध्ये करण्यात आलेल्या अपडेट्सचा फायदा मिळू शकतो. यामध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये अपडेटेड कॅमशाफ्ट प्रोफाइल, फ्युएल इंजेक्टर माउंटिंग अँगलमध्ये बदल, नवीन क्रँककेस डिझाईन आणि सुधारित एअर इनटेक सिस्टम यांचा समावेश आहे. तसेच ट्रान्समिशनमध्ये रोलर टाईप वन वे क्लच आणि बदललेले क्लच स्प्रिंग्स दिले जाऊ शकतात. बर्गमन स्ट्रीटमध्येही अशाच प्रकारचे सुधारित तंत्रज्ञान आणि मॉडेल-विशिष्ट ट्युनिंग दिली जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुझुकी कंपनी बर्गमन स्ट्रीटचा अधिक पॉवरफुल म्हणजेच जास्त डिस्प्लेसमेंट असलेला व्हर्जन, जसे की 150 सीसी मॉडेल सादर करू शकते, अशीही चर्चा बाजारात सुरू आहे.
फीचर्सच्या बाबतीतही नवीन बर्गमन स्ट्रीट अधिक अपडेटेड असण्याची शक्यता असून त्यामध्ये 4.2 इंचाचा कलर टीएफटी डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि एबीएससारखे सेफ्टी फीचर्स दिले जाऊ शकतात. त्यामुळे हा मॅक्सी स्टाईल स्कूटर अधिक आधुनिक आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज होईल.
सध्या बाजारात उपलब्ध बर्गमन स्ट्रीट स्कूटर तीन व्हेरिएंटमध्ये विकला जात असून त्याची किंमत सुमारे 93,676 रुपयांपासून 1.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. 2022 मध्ये एक्स व्हेरिएंट सादर केल्यानंतर या स्कूटरमध्ये फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे 2026 मध्ये येणारे हे नवीन मॉडेल ग्राहकांसाठी मोठे अपडेट ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule