आयपीएल २०२६ : विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीची विजयी सलामी
बंगळुरु, 29 मार्च (हिं.स.)आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. बंगळूर येथील एम. चिन्ना
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ


बंगळुरु, 29 मार्च (हिं.स.)आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना, हैदराबाद संघाने इशान किशन (८०) आणि अनिकेत वर्मा (४३) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत नऊ गडी गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १५.४ षटकांत चार गडी गमावून २०३ धावा करत विजय निश्चित केला.

२०२ धावांचे लक्ष्य गाठताना आरसीबीची सुरुवात डळमळीत झाली. फिल सॉल्ट अवघ्या आठ धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांनी सूत्रे हाती घेतली. या दोघांनी ४५ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. पडिक्कलने २१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने २६ चेंडूंमध्ये ६१ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा स्ट्राईक रेट २३४.६१ होता. दरम्यान, कर्णधार रजत पाटीदारने १२ चेंडूंमध्ये ३१ धावा करून संघाला विजयाच्या जवळ आणले. अखेरीस, विराट कोहलीने पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ३८ चेंडूंमध्ये ६९ धावांची दमदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. कोहलीने ३३ चेंडूंमध्ये आपले ६४ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. टिम डेव्हिड १६ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, डेव्हिड पेनने हैदराबादसाठी दोन विकेट्स घेतल्या, तर जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने नऊ गडी गमावून २०१ धावा केल्या. हैदराबादची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड अनुक्रमे सात आणि ११ धावांवर बाद झाले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीश रेड्डीलाही केवळ एक धाव करता आली. २९ धावांत तीन गडी गमावल्यानंतर, कर्णधार इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी सनरायझर्स हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. क्लासेनने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २२ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. इशान किशन पाच षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने ३८ चेंडूंमध्ये ८० धावा करून बाद झाला. या दोघांव्यतिरिक्त, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनिकेत वर्माने तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. अनिकेतच्या खेळीमुळेच सनरायझर्सने २०० धावांचा टप्पा ओलांडला. आरसीबीकडून जेकब डफी आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande