चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ हंगामाची सुरुवात राजस्थान विरुद्धच्या सामन्याने करणार
गुवाहाटी, 29 मार्च (हिं.स.) आयपीएलमधील पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्स सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल २०२५ मधील निराशाजनक कामगिरीनंतर दोन्ही संघ
संजू सॅमसन आणि रविंद्र जडेजा


गुवाहाटी, 29 मार्च (हिं.स.) आयपीएलमधील पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्स सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल २०२५ मधील निराशाजनक कामगिरीनंतर दोन्ही संघ या हंगामात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असतील.

मागील हंगामात राजस्थान संघ नवव्या स्थानावर होता, तर सीएसके तळाशी होता. पण, आयपीएलच्या १९ व्या हंगामापूर्वी सीएसकेच्या अडचणी वाढल्या आहेत. सीएसकेचा माजी कर्णधार एम.एस. धोनी पहिल्या दोन आठवड्यांसाठी संघासोबत खेळण्याची शक्यता कमी आहे. पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे धोनी पुनर्वसन उपचार घेत आहे, त्यामुळे तो दोन किंवा तीन सामने मुकू शकतो.

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने १५ सामने जिंकले आहेत. २०२५ मध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण दोन सामने खेळले गेले होते आणि राजस्थानने दोन्ही जिंकले होते. यावेळी राजस्थान नवीन कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. राजस्थानने संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना संघात घेतले आहे. राजस्थानसाठी वाईट बातमी ही आहे की, करन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे आणि त्याच्या जागी दसुन शनाकाला संघात स्थान देण्यात आले आहे.

या सामन्यात सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल. वैभवने गेल्या वर्षभरात आपल्या फलंदाजीने लक्षणीय छाप पाडली आहे आणि हा हंगाम त्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुराईल हे देखील फलंदाजीने प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक असतील. दरम्यान, शिमरॉन हेटमायर नुकत्याच संपन्न झालेल्या २०२६ च्या टी२० विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता.

दरम्यान, आयुष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. सरफराज खान, शिवम दुबे आणि उर्विल पटेल मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. संघाला देवाल्ड ब्रेविसकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, चेन्नईचा वेगवान गोलंदाजीचा मारा या हंगामात थोडा कमकुवत दिसत आहे. खलील अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, मॅट हेन्री आणि स्पेन्सर जॉन्सन यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. अकील हुसेन आणि नूर अहमद फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande