
पाटणा, 31 मार्च (हिं.स.) : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मघडा गावात मंगळवारी सकाळी माता शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारानिमित्त शीतलाष्टमीच्या पूजेसाठी मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अचानक गोंधळ उडून चेंगराचेंगरीची घटना घडली.
दरम्यान, शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या शीघ्र आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात जत्रा भरली होती आणि हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. मात्र, मंदिराचे गर्भगृह लहान असल्याने एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते. अनेक भाविकांनी रांग पाळली नाही आणि पुढे जाण्याची घाई केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या गोंधळात लोक एकमेकांच्या अंगावर पडू लागले आणि चेंगराचेंगरी झाली.या दुर्घटनेत मृत झालेल्यांपैकी रीता देवी (५०) आणि रेखा देवी (४५) यांची ओळख पटली आहे. रेखा देवी यांच्या मुलाने सांगितले की, त्यांची आई जत्रेसाठी मंदिरात गेली होती. घटनेची माहिती मिळताच तो घटनास्थळी पोहोचला आणि आईला रुग्णालयात नेले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. इतर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.जखमींना तातडीने स्थानिक मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत बचावकार्य सुरू केले.
शीतलाष्टमीच्या दिवशी या मंदिरात विशेष पूजा केली जाते. या दिवशी भक्त देवीला थंड अन्नाचा नैवेद्य अर्पण करतात आणि घरात चूल पेटवली जात नाही, अशी परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी मंदिरात नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, यंदा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मंदिर परिसर आणि जत्रा तात्काळ बंद केली आहे. तसेच या घटनेबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून, गर्दी नियंत्रणात अपयश आल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. ही घटना अत्यंत दुःखद असून सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जखमींना योग्य उपचारांचे आश्वासन दिले आणि दिवंगत आत्म्यास शांती लाभो व जखमी लवकर बरे होवोत यासाठी प्रार्थना केली.
राष्ट्रपतीही नालंदामध्येच
प्रत्यक्षदर्शींनी या घटनेला पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. चैत्र महिन्यात शीतला देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. तिथं पोलीस बंदोबस्त का नव्हता असा प्रश्न विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील नालंदामध्येच आहेत. त्या नालंदा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात सामील होण्यासाठी नालंदा इथं आल्या आहेत. त्यामुळं पोलिसांचा फौजफाटा विद्यापीठात जास्त असल्यामुळं शीतला देवी मंदिरात पोलिस बंदोबस्त तुटपुंजा ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule