
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील बुधवार (दि. ४)पर्यंत मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी, शेतक-यांसाठी सूचना निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार विजेचा आवाज ऐकू आल्यावर त्वरित घरात किंवा सुरक्षित ठिकाणी जावे, झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूजवळ उभे राहू नये, मोबाईल फोनचा वापर मोकळ्या जागेत टाळावा, निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर न पडता पाय एकत्र करून बसून राहावे आदींचा समावेश आहे. तर प्रशासनस्तरावर ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत तात्काळ जनजागृती करावी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सज्ज ठेवावे, शाळा, सभागृह तसेच सार्वजनिक इमारती सुरक्षित आसरा म्हणून खुले ठेवावे, हवामान खात्याचा अद्यायावत संदेश गाव पातळीवरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शेतकरी बांधवांनी या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळावरील कामकाज तात्पुरते थांबवावे, यात्रास्थळे आणि मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने रद्द करावेत, असे आवाहन परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर मंगळवारी(दि. ३१) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारनंतर परभणी जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन अनेक ठिकाणी वादळीवारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे ग्रामीण भागासह परभणी शहरातही वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis