
बीड, 04 मार्च, (हिं.स.)। अंबाजोगाई शहर पोलिसांनी शेपेवाडी परिसरात धाड टाकून ५५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या घरी बेकायदेशीररीत्या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करत होता. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता, घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मुद्देमाल आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या मान्यतेनंतर आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंबाजोगाई पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis