
जळगाव, 04 मार्च, (हिं.स.) - जळगाव शहरात लिफ्ट देण्याच्या बहाणा करून एका ५२ वर्षीय व्यक्तीची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सलमान खान अमानउल्ला खान हे अजिंठा चौफुली परिसरात रावेरला जाण्यासाठी उभे होते. त्यावेळी एका कारचालकाने १०० रुपये देण्याच्या मोबदल्यात रावेरला सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार खान हे कारमध्ये बसले.मात्र काही अंतर गेल्यानंतर कारमधील इतर साथीदारांनी त्यांच्या हातांना पकडून ठेवले.
दरम्यान, एकाने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील ९ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेत खाली उतरवून दिले. ही घटना अजिंठा चौफुली ते प्रीतम पार्क दरम्यान घडली.या घटनेनंतर १ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारचालक शंभू सुभाष पाटील (रा. पिंप्राळा) याला अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर