
जळगाव, 04 मार्च (हिं.स.) अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 63 किलो 710 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन आलिशान कारसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 22 लाख 74 हजार 200 रुपये इतकी आहे.
जळगावकडून पहूरच्या दिशेने इनोव्हा कार (एमएच 04 डीजे 242) मधून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने आणि पहूर पोलिसांनी वाकोळ गावाजवळ सापळा रचला. संशयित कार दिसताच पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी सागर संजय इंगवले (नवी मुंबई) इरफान अक्रम शेख (मुंबई) अमन ताज खान (मुंबई) यांना घटनास्थळी अटक केली.आरोपींच्या चौकशीतून हा गांजा धुळे येथील नईम शेख खान मेहमूद खान तहसीद खान रसूल खान यांच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून मारुती कार (एमएच 18 डब्ल्यू 2526) देखील जप्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर