प्रेमविवाहाच्या रागातून बोईसरमध्ये गोळीबार; फरार आरोपीला यवतमाळहून अटक
पालघर, 04 मार्च (हिं.स.)। प्रेमविवाहाचा राग मनात धरून घरात घुसून गोळीबार करत खून केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला पालघर पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पालघर पोलीस यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे
प्रेमविवाहाच्या रागातून बोईसरमध्ये गोळीबार; फरार आरोपीला यवतमाळहून केली अटक


पालघर, 04 मार्च (हिं.स.)।

प्रेमविवाहाचा राग मनात धरून घरात घुसून गोळीबार करत खून केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला पालघर पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पालघर पोलीस यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे केली.

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास वाळवे (पो. महागाव, ता. जि. पालघर) येथील बसस्टॉपजवळील घरात ही धक्कादायक घटना घडली. तक्रारदार प्रितेश सुरेश वरखंडे (वय २२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी प्रेमसंबंधातून विवाह केला होता. या विवाहाला आरोपी उमेश उर्फ प्रल्हाद मोतीराम घरत (वय ५२, रा. बेटेगाव, ता. जि. पालघर) विरोध करत होता.

प्रेमविवाहाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या घरी घुसून त्यांच्या वडिलांवर, सुरेश राजा वरखंडे (वय ५२) यांच्या डोक्याच्या मागील बाजूस पिस्तुलातून गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीस मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच मिरचीपूड फेकून मोटारसायकलवरून पसार झाला.

या प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर १ मार्च २०२६ रोजी आरोपीला वर्णी पोलीस स्टेशन , जिल्हा यवतमाळ येथून ताब्यात घेण्यात आले व अटक करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande