इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतापर्यंत; मुंबईच्या कांदिवलीतील तरुणाचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू
मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता थेट भारतापर्यंत पोहोचली आहे. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील द
इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतापर्यंत; मुंबईच्या कांदिवलीतील तरुणाचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू


मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता थेट भारतापर्यंत पोहोचली आहे. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील दीक्षित सोलंकी (वय २५) याचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असून आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मूळचा गुजरातमधील दीव येथील असलेला दीक्षित काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत आला होता. तो मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ‘एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर खलाशी म्हणून कार्यरत होता. मस्कत किनारपट्टीपासून सुमारे बावन्न सागरी मैल अंतरावर असताना स्फोटकांनी भरलेल्या मानवरहित बोटीने जहाजावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन कक्षात भीषण स्फोट होऊन आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.

दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा कर्तव्यावर परतला होता. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे सोलंकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेपूर्वी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘एमव्ही स्कायलाइट’ या जहाजावरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात बिहारमधील आशिष कुमार आणि राजस्थानमधील दलीप सिंग हे दोन भारतीय खलाशी गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या सलग घटनांमुळे आखाती सागरी मार्गावरील तणाव अधिकच वाढला आहे.

भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त

ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande