मनसे-ठाकरे सेनेतील वाद निवळला; प्रभाग समित्यांवर तोडगा
मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दि
MNS and Thackeray Sena dispute resolved


मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींनंतर आता सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरे सेनेकडून त्यांच्या काही अटी मान्य करण्यात आल्याचे समजते.

महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये स्वीकृत नगरसेवक पद आणि प्रभाग समित्यांच्या वाटपावरून मतभेद निर्माण झाले होते. ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मनसेकडून प्रभाग समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याचा इशारा दिला जात होता. त्यामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे पंचवीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर वातावरणात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच यशवंत किल्लेदार यांच्यातही सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेनंतर ठाकरे सेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. जी नॉर्थ ही प्रभाग समिती दोन वर्षांसाठी मनसेला देण्यात येणार आहे. त्याशिवाय एफ साऊथ, पी पूर्व-पश्चिम तसेच एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्येही वर्षभरासाठी सहभाग देण्याचा तोडगा काढण्यात आल्याचे कळते. मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले नसले तरी त्याबदल्यात महत्त्वाची जी नॉर्थ प्रभाग समिती दोन वर्षांसाठी मिळवण्यात मनसे यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, मनसेच्या नेत्यांसोबत सकारात्मक आणि विधायक चर्चा झाली. मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढली होती आणि पुढील कामकाजही एकत्रितपणे करण्याची दोघांची इच्छा आहे. प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत एकजूट राखणे अधिक महत्त्वाचे असून त्यादृष्टीनेच निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही समित्यांची अध्यक्षपदे काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाटली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर भाष्य करताना सांगितले की, बैठकीत प्रभाग समित्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. कोणता वॉर्ड कोण घेणार यावर सकारात्मक चर्चा झाली असून सर्व विषय माध्यमांसमोर मांडता येत नाहीत. मनसेने वेगळी भूमिका घेतली नव्हती, तर सन्मानजनक तोडगा निघावा हीच भूमिका होती, असे त्यांनी स्पष्ट केले. अंतिम चर्चा पूर्ण झाली असून अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

एकूणच, काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधला गेला आहे. महापालिकेतील सत्तास्थैर्य आणि पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा तोडगा महत्त्वाचा मानला जात आहे. एकजुटीचा संदेश देत ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे आगामी काळात महापालिकेतील कामकाजात एकत्रितपणे भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande