श्री जगन्नाथ मंदिरातील ‘रत्न भंडार’ मोजदाद प्रक्रिया 25 मार्चपासून
पुरी, 04 मार्च (हिं.स.) : ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या ‘रत्न भंडारातील मौल्यवान आभूषणांची बहुप्रतीक्षित मोजदाद आणि यादी तयार करण्याची प्रक्रिया अखेर 25 मार्चपासून सुरू होणार आहे. ओडिशा सरकारने चैत्र शुक्ल सप्तमी (बुधवार) दुपारी 12:
श्री जगन्नाथ मंदिर लोगो


पुरी, 04 मार्च (हिं.स.) : ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या ‘रत्न भंडारातील मौल्यवान आभूषणांची बहुप्रतीक्षित मोजदाद आणि यादी तयार करण्याची प्रक्रिया अखेर 25 मार्चपासून सुरू होणार आहे. ओडिशा सरकारने चैत्र शुक्ल सप्तमी (बुधवार) दुपारी 12:12 ते 1:45 या शुभ मुहूर्तावर या प्रक्रियेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी 1978 साली रत्न भंडारातील दागिन्यांची गणती करण्यात आली होती. ती प्रक्रिया तब्बल 72 दिवस चालली होती. आता सुमारे 48 वर्षांनंतर पुन्हा एकदा सविस्तर मोजदाद होणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता आहे.या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, राष्ट्रीयीकृत बँकेचे नोंदणीकृत सराफही मोजदाद प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. राज्य सरकार दोन रत्नवैज्ञानिकांची नियुक्ती करणार असून, ते आभूषणांवरील मौल्यवान रत्नांची ओळख पटवतील. मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद पाढी यांनी सांगितले की, गणती किती दिवस चालेल, हे आत्ताच सांगणे घाईचे ठरेल. कोणत्या दिवशी कोणत्या दागिन्यांची मोजदाद होईल, याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाईल.

मोजदादीची पद्धत व सुरक्षा व्यवस्था

बाहेरील रत्न भंडारात भगवान जगन्नाथांच्या दैनंदिन वापरातील आभूषणे ठेवली जातात. ती सर्वप्रथम मोजली जातील.

त्यानंतर आतील रत्न भंडार उघडले जाईल.

सोने, चांदी व इतर मौल्यवान आभूषणांसाठी स्वतंत्र बॉक्स ठेवले जातील.

सुमारे 10 जण आभूषणे सुरक्षितपणे बॉक्समध्ये ठेवण्याचे काम पाहतील.

दंडाधिकारी दररोज खजिन्यातून रत्न भंडाराची चावी आणतील व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी जमा करतील.

शनिवार-रविवार आणि सण-उत्सवाच्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मोजदाद केली जाणार नाही.

ओडिशा उच्च न्यायालयाने ही गणती 3 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक असल्यास मुदतवाढ मागितली जाऊ शकते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

‘रत्न भंडार’ हा भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान दागिन्यांचा प्राचीन खजिना आहे. मंदिराच्या जगमोहन (सभा कक्ष) उत्तर दिशेला तो स्थित आहे.

1978 मधील नोंदीनुसार, येथे 128.38 किलोग्राम सोने आणि 221.53 किलोग्राम चांदीची आभूषणे असून, त्यामध्ये हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांचाही समावेश आहे.

14 जुलै 2024 रोजी 46 वर्षांनंतर रत्न भंडार दुरुस्तीसाठी उघडण्यात आले होते. आता मोजदाद पूर्ण झाल्यानंतर सर्व मौल्यवान आभूषणे पुन्हा मूळ भंडारात ठेवण्यात येणार आहेत.

ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पडणार असल्याने देशभरातील भाविकांचे लक्ष पुरीकडे लागले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande