
मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून आता उष्णतेचा तडाखा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पावसानंतर थंडीचा प्रभाव कमी झाला असून बहुतांश भागात तापमान झपाट्याने वाढत आहे. भारतीय हवामान विभाग यांनी राज्यातील काही भागांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच सोलापूरमध्येही हंगामातील उच्चांकी ३८ अंश तापमान नोंदवले गेले असून मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाने चांगलीच झळ बसू लागली आहे. पुण्यात सलग दोन दिवस कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले असून पारा ३६ अंशांवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत तापमान ४० अंशांच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दुपारी बारा ते चार या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आर्द्रतेमुळे अस्वस्थता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान २९ ते ३२ अंश तर किमान तापमान २४ ते २६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात भर पडू शकते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे देशातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर राज्यातील नीचांकी तापमान धुळ्यात १२.८ अंश सेल्सिअस होते. एकीकडे काही राज्यांत अजूनही पावसाचा प्रभाव कायम असताना महाराष्ट्रात मात्र उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे लागली असून पुढील काही दिवस उष्णतेचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule