
अंदाजपत्रकातील १३२ कोटींच्या कर्जावरून इस्लाम व एमआयएम नेत्यांत वाद
मालेगाव, 05 मार्च (हिं.स.) : मालेगाव महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत बुधवारी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी इस्लाम पक्ष आणि एमआयएम पक्षातील नेत्यांमध्येच वाद निर्माण झाल्याने सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे मालेगावच्या राजकारणात नवीन घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत आयुक्त रवींद्र जाधव यांनी स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने थेट महासभेसमोर अंदाजपत्रक सादर केले. मात्र, स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड झाली असताना अंदाजपत्रक थेट महासभेसमोर ठेवणे कायदेशीर आहे का, असा सवाल एमआयएमचे सदस्य खालीद परवेज यांनी उपस्थित केला. प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर सभेचे कामकाज पुढे सुरू झाले.
१३२ कोटींच्या कर्जावरून प्रश्नांची सरबत्ती
सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात ५९९ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि ५१२ कोटी रुपयांचे सरकारी अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. यामध्ये १३२ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर आणखी कर्जाचा बोजा का टाकला जात आहे, असा सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केला. कर्ज घेण्याऐवजी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा सल्लाही सदस्यांनी दिला.
मालमत्ता करावरून वाद विकोपाला
उत्पन्नाच्या स्रोतांवर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे मुस्तकीन डिग्निटी यांनी मालमत्ता कर वसुलीतील ढिसाळपणाचा मुद्दा मांडला. त्यानंतर एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी मालमत्ता कराव्यतिरिक्त इतर पर्यायांचा विचार करण्याची भूमिका मांडली. या भूमिकेला इस्लाम पक्षाचे गटनेते खालीद शेख यांनी तीव्र आक्षेप घेतला.
या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला. सुरुवातीला शब्दांपुरता असलेला वाद काही वेळातच उग्र झाला आणि दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने काही काळ सभेचे कामकाज थांबवावे लागले.अखेरीस इतर सदस्यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना शांत केले आणि पुन्हा सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV