
रत्नागिरी, 5 मार्च, (हिं. स.) : ऊन, वारा, पाऊस अशा कठीण प्रसंगावर मात करत लाइनमन अहोरात्र परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावत असतात. ग्राहकांच्या घरातील वीजपुरवठा अखंड ठेवणारा हा लाइनमन महावितरणचा कणा आहे, असे प्रतिपादन कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले.
महावितरण रत्नागिरी परिमंडल कार्यालयात लाइनमन दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, सहाय्यक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजित सिकनिस, जितेंद्र फुलपगारे, हरी ताम्हणकर, औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व लाइनमनचा सन्मान करण्यात आला. विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणात ठिकठिकाणी लाइनमन दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री.पडळकर म्हणाले, कोकणातील लाइनमन हा महावितरणचा खरा योद्धा आहे. त्यांनी अविरत मुसळधार पाऊस वादळ-वारा याचबरोबर फयान, निसर्ग, तोक्ते यांसारख्या वादळातही अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम केले आहे. वाहिनीवरील बिघाडांचा त्वरित निपटारा करत वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम लाइनमन करत आहेत. विद्युत वाहिनीवर काम करताना त्यांनी आता शून्य अपघाताचे ध्येय पुढे ठेवून काम करावे. त्यांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी.
रत्नागिरी परिमंडल मार्चअखेर शून्य थकबाकी करण्याचे आवाहनही दत्तात्रय पडळकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी