
अमरावती, ५ मार्च (हिं.स.) । अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी मासमापूर परिसरात एका शेतातील तात्पुरत्या तळ्यातील पाणी पिल्यानंतर ५१ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित महिला बचत गटावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढरी मासमापूर येथील ‘मासूम महिला बचत गटातील महिला नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्यांना चारण्यासाठी शिंगमोडी नदीकाठी गेल्या होत्या. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी शेतकरी श्रीकांत रुचके यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी शेतात तयार केलेल्या तात्पुरत्या तळ्यातील पाणी पाजण्यास सांगितले.
बकऱ्यांनी तळ्यातील पाणी पिल्यानंतर काही वेळातच त्या एकामागोमाग जमिनीवर कोसळू लागल्या. काय घडत आहे हे कळण्याआधीच अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला. घाबरलेल्या महिलांनी तात्काळ गावात संपर्क साधून मदतीसाठी फोन केले, मात्र डॉक्टर घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अनेक बकऱ्यांनी तडफडत प्राण सोडले.
या घटनेमुळे महिलांमध्ये मोठा आक्रोश पसरला. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या दुर्घटनेत एकूण ५१ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने संबंधित महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मृत बकऱ्यांच्या मालकांमध्ये शमशाद बी मोहम्मद रियाज, शहनाज बी वाईद खा, जयबून बी सलीमुद्दीन, हुस्ना बी शेख हमीद, शमाबी इस्राईल खा, शबाना बी सलमान खा, शकिला बी सय्यद रियाजुद्दीन आणि सलामा बी शेख इरफान यांचा समावेश आहे. या सर्व महिला ‘मासूम महिला बचत गट, मासमापूर पांढरी’च्या सदस्य असून त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून सुमारे सहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन बकरी पालन व्यवसाय सुरू केला होता.
महिलांनी संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार सुरज बोंडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून न्यायवैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले आहे. बकऱ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून अहवालानंतर याबाबत स्पष्टता येणार आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी