
बीड, 05 मार्च, (हिं.स.)। दहावीच्या हिंदी विषयाच्या परीक्षेला ९३५ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा केंद्रांच्या वर्गखोल्या झूमद्वारे जोडल्याने कॉपीच्या प्रकारावर पूर्णपणे आळा बसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला. गेवराई तालुक्यातील जातेगावच्या केंद्रावर कॉपी व पेपर फुटल्याचा आरोपही अफवा असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
३५ हजार २७४ विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाची परीक्षा दिली. जिल्ह्यातील ६५३ शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा जिल्ह्यातील १५६ केंद्रांवर होत आहे. बारावीच्या धर्तीवर दहावी परीक्षेसाठीही शिक्षणविभागाने सर्व केंद्रांवर झूम अॅपद्वारे नियंत्रणाचा प्रयोग केला आहे. बुधवारी हिंदीच्या पेपरला १५६ केंद्रांतील १५०० वर्गखोल्या झूमद्वारे जोडल्याची माहिती शिक्षणाधिकारी (मा.) प्रियाराणी पाटील यांनी दिली. या झूमचा अॅक्सेस बीडच्या नियंत्रण कक्षाला जोडून पथकाद्वारे निगराणी ठेवली जात होती.
सिरसदेवी (ता. गेवराई) येथील केंद्रात विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोलीत बसविले व जातेगाव येथील केंद्रात कॉपी पुरविल्याबाबत चौकशी सुरू असून, पेपर फुटल्याबाबत खातरजमा केली असता, हा तथ्यहीन आरोप आढळल्याचा दावा शिक्षण विभागाने पत्रकाद्वारे केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis