
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी आशाताई शिवाजीराव भिसे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व लाभले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
यापुढे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून आशाताई भिसे लोकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, याची दक्षता घेतली जाईल. येणाऱ्या काळात भ्रष्टाचार किंवा चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सावध राहण्याची गरज असून, गैरप्रकारांना कधीही पाठबळ दिले जाणार नाही, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
आशाताई भिसे यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सदस्य म्हणून राज्यभर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि विविध प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली होती. तसेच अनेक वर्षांपासून बचत गटांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तळागाळात काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख तसेच माजी आमदार धीरज देशमुख यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नेत्यांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत त्या ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील आणि लोककल्याणासाठी सातत्याने कार्य करतील, यात शंका नाही. आशाताई भिसे यांची काँग्रेस गटनेतेपदी झालेली निवड ही जिल्ह्यासाठी सकारात्मक पाऊल मानली जात असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis