
अमरावती, 05 मार्च (हिं.स.) : अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) अमरावती येथे जन्मजात मूकबधिर असलेल्या चार वर्षांच्या बालिकेच्या कॉक्लियर इम्प्लांटनंतर ‘स्विच ऑन’ कार्यक्रम पार पडला. या विशेष क्षणी बालिकेने पहिल्यांदाच आवाज ऐकला आणि उपस्थित सर्वांसाठी तो अत्यंत भावनिक व आनंददायी क्षण ठरला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारीआशिष येरेकर म्हणाले, “ही शस्त्रक्रिया या बालिकेसाठी नवजीवन देणारी ठरणार आहे. आता ती इतर मुलांप्रमाणे आनंदाने जीवन जगू शकेल.” त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे कौतुक करत त्यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा केली. सदर बालिका रा. आष्टी, जि. वर्धा येथील असून तीला कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी तिच्या कुटुंबीयांनी बरेच खाजगी रुग्णालयात नेले मात्र रुग्ण योजनेत बसत नसल्यामुळे व रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्या कारणाने तिची शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करणे कुटुंबीयांना शक्य नव्हते व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील पूर्वी झालेल्या यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट या विषयी प्रसारमाध्यमातून जेव्हा ऐकले तेव्हा कुटुंबीयांनी त्या चिमुर्डीला रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आणले व तिच्यावर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर ‘स्विच ऑन’ प्रक्रिया साउंड प्रोसेसर ऍक्टिव्हेशनद्वारे करण्यात आली. यावेळी बालिकेने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हृदयस्पर्शी होता.
तज्ञांच्या माहितीनुसार, पुढील दोन वर्षे नियमित ऑडिओलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली स्पीच थेरपी घेतल्यास तिला बोलणे शिकणे सुलभ होणार आहे. सदर रुग्ण दोन वर्षांवरील असल्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारासाठी पात्र नव्हती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आली.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जीवन वेदी (नाक, कान, घसा तज्ञ व विभाग प्रमुख, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर), विशेष कार्य अधिकारी तसेच नाक, कान, घसा तज्ञ डॉ. मंगेश मेंढे, बधिरीकरन तज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले,ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट लक्ष्मण मोरे, न्यूरो फिजिशियन डॉ.अनिता आंबोरे ,औषध निर्माण अधिकारी योगेश वाडेकर , अधीसेविका चंदा खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली इन्चार्ज सिस्टर दिपाली देशमुख व ओटी स्टाफ यांचे शस्त्रक्रियेसाठी विशेष योगदान राहिले.
या कार्यक्रमाला डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. माधवी काजदेकर, अधिसेविका चंदा खोडके, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, कार्यालयीन अधीक्षक श्रीकांत इखे, विजय गाढे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे एका बालिकेच्या आयुष्यात अमूल्य बदल घडून आला असून, गरीब व गरजू रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत आधुनिक व महागड्या उपचार सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी