
उन्हाळ्यात मागणी १४५ एमएलडीपर्यंत जाण्याची शक्यता
अमरावती, 05 मार्च (हिं.स.) : अमरावती शहर व बडनेरा उपनगरात आगामी उन्हाळ्यात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील पाण्याची गरज सुमारे १४५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी)पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मात्र, सुमारे तीस वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या जीर्ण वितरिकेमुळे वाढीव पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) स्पष्ट केले आहे.
सध्या मजीप्रामार्फत शहरातील सुमारे एक लाख चार हजार ग्राहकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विद्यमान स्थितीत दररोज अंदाजे १३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात मागणी १४५ एमएलडीपर्यंत वाढण्याची शक्यता असूनही जुने पाईपलाईन जाळे वाढीव दाब सहन करू शकत नसल्याने पुरवठा वाढविणे कठीण ठरत आहे. अतिरिक्त दाबामुळे वितरिके फुटण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमरावती शहरात १९९४ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. त्याच वेळी बसविण्यात आलेल्या वितरिकांचे आयुष्य आता संपत आले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाढीव दाबामुळे पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागतो आणि परिणामी शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.
दरम्यान, अमृत-२ योजनेअंतर्गत शहरात नवीन वितरिका बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. संबंधित काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.
मजीप्रामार्फत अप्पर वर्धा धरणातून पाणी उचलून शहराला पुरवठा केला जातो. यासाठी ५८ दलघमी पाण्याचे आरक्षण असून सध्या सुमारे ४८ दलघमी पाण्याची उचल केली जात आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १५६ एमएलडी असली तरी जीर्ण वितरिकेमुळे सध्या १३० एमएलडीपर्यंतच पाणीपुरवठा शक्य आहे.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे घरगुती वापरासोबतच शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांमध्ये कूलरचा वापर वाढतो. त्यामुळे पाण्याची गरज अधिक भासते. याशिवाय भूगर्भातील पाणीपातळी घटणे आणि नागरिकांकडून होणारा पाण्याचा अपव्यय यामुळेही मागणी वाढत असल्याचे मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता संजय लेव्हरकर यांनी सांगितले.
महत्त्वाची आकडेवारी :
पाणीपुरवठा ग्राहक – १,०४,०००
सध्याचा दररोज पुरवठा – १३० एमएलडी
लोकसंख्येनुसार गरज – १४२ एमएलडी
अपेक्षित मागणी (उन्हाळा) – १४५ एमएलडी
पाणीपुरवठा योजना सुरू – १९९४
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी