
नांदेड, 05 मार्च (हिं.स.)।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, विद्यापीठ परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत डॉ. वाघमारे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
या श्रद्धांजली सभेला विद्यापीठातील प्रामुख्याने प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्रभारी कुलसचिव तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जनार्दन वाघमारे यांनी विद्यापीठाच्या स्थापनेत आणि जडणघडणीत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या जाण्याने केवळ विद्यापीठाचेच नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis