
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)।
ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ प्रभावी व यशस्वीपणे राबवावे. या शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
हिंगोली जिल्ह्यातील सरपंचांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पापळकर यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्याने पहिल्या टप्प्यात किमान पाच पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. यासाठी आवश्यक साधनसामग्री, प्रशासकीय मान्यता व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. तसेच सरपंचांनी शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
या शिबिरांमध्ये मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी निश्चित दिनांकांना उपस्थित राहून विविध महसूल विषयक कामांचा निपटारा करणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा दुरुस्ती, अभिलेख पडताळणी, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारणे व मार्गदर्शन करणे या सेवा उपलब्ध राहणार आहेत.
तसेच ‘जिवंत सातबारा’ मोहिम, तुकडेबंदी कायद्याविषयी जनजागृती, अकृषीक तरतुदींबाबत माहिती, डिजिटल सातबाराची वैधता, भूसंपादन प्रकरणे, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, प्रधानमंत्री किसान योजना आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेसंदर्भात माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण तसेच पांदण रस्त्यांच्या मान्यतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
शिबिरांचे प्रभावी आयोजन करून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जिल्ह्यात पाणंद रस्त्यांसाठी एकूण 625 किमीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून उपलब्ध निधीनुसार पहिल्या टप्प्यात 25 किमी रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. उर्वरित कामे निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. तसेच शासनाच्या 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक गावात शिबिरांचे प्रभावी आयोजन करून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनीही या अभियानाचा आढावा घेत मार्च ते मे 2026 या कालावधीत हे शिबीर अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शासन निर्णयानुसार शिबिरांचे सुयोग्य नियोजन करून ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis