बनावट ठराव, खोटे शिक्के; मुख्याध्यापक व शिक्षकावर गुन्हा दाखल
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात बनावट कागदपत्रे, खोटे ठराव आणि सचिवांच्या बनावट शिक्का-स्वाक्षरीच्या आधारे शिक्षक समायोजन करून पदोन्नती मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी औसा येथील प्
फसवणूक


लातूर, 05 मार्च (हिं.स.)।

औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात बनावट कागदपत्रे, खोटे ठराव आणि सचिवांच्या बनावट शिक्का-स्वाक्षरीच्या आधारे शिक्षक समायोजन करून पदोन्नती मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी औसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महात्मा बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक सहशिक्षक दत्तात्रय गोविंद सुरवसे यांच्या सेवानिवृत्तीनंतर मराठी व इतिहास विषयाची जागा रिक्त झाली होती. या पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ शिक्षकांचा विचार होणे अपेक्षित असताना, सेवाज्येष्ठता यादीतील अनेक शिक्षकांना डावलून गणेश मोतीराम बिराजदार यांना लाभ मिळेल असा प्रस्ताव पुढे रेटण्यात आला.

या प्रक्रियेत शालेय समितीची बैठक न होता देखील बैठक झाल्याचा दाखला देत कार्यवाही पुस्तिकेत नोंद नसलेला ठराव तयार करण्यात आला. प्रस्तावासोबत जोडलेली कार्यकारी मंडळ व शालेय समिती सदस्यांची यादीही वास्तवाशी विसंगत आढळली. संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन परमेश्वर डोके यांच्या नावाचा बनावट शिक्का व स्वाक्षरी वापरून प्रस्ताव अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला.

सेवाज्येष्ठता यादीत गणेश बिराजदार यांचा क्रमांक १५ वा असतानाही वरिष्ठ शिक्षकांना बायपास करून त्यांना समायोजनाचा लाभ देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. मुख्याध्यापक परमेश्वर पंचप्पा स्वामी यांच्या सही-शिक्क्यासह हा प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला.

या गैरप्रकाराची माहिती संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन डोके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलिस ठाण्याकडे तक्रारी केल्या. मात्र दीर्घकाळ कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत औसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार किल्लारी पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक परमेश्वर पंचप्पा स्वामी आणि शिक्षक गणेश मोतीराम बिराजदार यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व संगनमत यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande