
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या मोटार पंप, वीज वायर, कृषी अवजारे व इतर साहित्याची चोरी झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत विशेष संवेदनशीलतेने काम करत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांचा कसोशीने तपास करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंप, वीज वायर तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य चोरीस जाण्याच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्यांचा त्वरित व प्रभावी तपास करून आरोपींना अल्पावधीत अटक करणे व चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे यावर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने उदगीर तालुक्यातील कौळखेड परिसरात घडलेल्या पाणबुडी मोटार वायर चोरीच्या गुन्ह्याचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी अल्पावधीत उलगडा केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी गोरख जग्गा चव्हाण (वय ५५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कौळखेड ता. उदगीर जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गु.र.नं. १०१/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांच्या शेतातील गुरूधाळ तलावात बसविण्यात आलेल्या पाणबुडी मोटारीस जोडलेले अंदाजे १०० फूट वायर (किंमत अंदाजे ₹१२,०००) हे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन व निर्देशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथक आरोपी व मुद्देमालाचा शोध होते. आदेश देण्यात आले. त्यानुसार खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाला समजले की काही संशयित युवक हेर (ता. उदगीर) येथे थांबले आहेत. त्यानुसार पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता खालील आरोपी मिळून आले :
1) पवन विश्वनाथ कळसे, वय २० वर्षे, रा. हेर, ता. उदगीर
2) धीरज विश्वनाथ कसबे, वय २२ वर्षे, रा. करडखेल, ता. उदगीर, जि. लातूर
तसेच दोन विधीसंघर्षित बालकही त्यांच्या सोबत आढळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान आरोपींकडून पाणबुडी मोटारचे वायर अंदाजे ४०० फूट – किंमत अंदाजे ₹२०,०००, चार मोटारसायकली – किंमत अंदाजे ₹१,२५,०००, सहा मोबाईल फोन – किंमत अंदाजे ₹१,२०,०००
असा एकूण ₹२,६५,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींपैकी काही वाहनांचा संबंध पोलीस स्टेशन हडपसर, पुणे येथील गु.र.नं. ३१/२०२६ मधील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याशी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कारवाईमुळे दुसऱ्या जिल्ह्यातील गुन्हाही उघडकीस आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अंमलदार डफळे करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार राम बनसोडे, संदीप केंद्रे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे यांनी पार पाडली असून सदर लातूर जिल्हा पोलीस दल शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis