
पुणे, 05 मार्च (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत रक्कम वसुलीत ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या क्रीडा प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाड्याने देताना महापालिका क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी ५० लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात निदर्शनास आले आहे. अनामत रक्कम, भाडे वसुली, सामान्य पावती, इतर भाडे व आकार पावती, भाडे वसुलीची परस्पर विल्हेवाट लावणे, इतर साहित्य साधनसामग्रीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे
का, भाडे वसुली प्रकरणातील गैरव्यहाराची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करुन दोषी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येत आहे, असे विविध प्रश्न आमदार जगताप यांनी विचारले होते.त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भाड्याने देताना महापालिकेच्या क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांनी ५० लाख ७० हजार ६२६ रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु