
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासासाठी 'इन्कम जनरेशन' आणि 'प्रदूषण नियंत्रण' या दोन सूत्रांवर भर दिला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर,नगरसचिव मुकेश कोळप , अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. स्थायी समिती सभापती दालनात प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर भूमिका मांडताना ते बोलत होते.बैठकीत मनपाच्या मुख्य लेखा विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रजा मंजुरी कामी सादर केलेल्या विनंती अर्जाला मंजुरी देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिना”निमित्त दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमासाठी यामध्ये कलाकार, वक्ते मानधन, सांस्कृतिक कार्यक्रम असा एकूण खर्च र. रु. ७,५०,०००/- (अक्षरी र.रु. सात लाख पन्नास हजार फक्त) इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु