
एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी उन्हात उभे राहण्याची वेळ
अमरावती, 05 मार्च (हिं.स.) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेतही अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्डासाठी नोंदणी करण्यासाठी बसस्थानकात येत आहेत.
बसस्थानकात सकाळी आठ वाजल्यापासूनच रांगा लागण्यास सुरुवात होत असून नोंदणीसाठी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक एकाच रांगेत उभे राहत आहेत. सकाळी दहा वाजल्यानंतर तापमानात मोठी वाढ होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करत आपला क्रमांक येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसस्थानकात थंड पाण्याची व्यवस्था नसल्याने ज्यांनी स्वतःसोबत पाण्याची बाटली आणली आहे त्यांनाच तहान भागवता येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
एकाच ठिकाणी नोंदणीमुळे वाढली गर्दी
अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकातच नोंदणीची व्यवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुसरीकडे राजापेठ येथील बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असून तेथेही नोंदणीची सुविधा सुरू करावी, अशी मागणी काही ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. वाहतूक निरीक्षक संदीप रायलवार यांनी सांगितले की, महामंडळाकडून या कामासाठी २६० एजंट्स नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र त्यांना अद्याप मशीनकिट मिळालेले नसल्याने सध्या अमरावती स्थानकात गर्दी होत आहे. जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच एजंट्समार्फत नोंदणी सुरू झाल्यानंतर ही गर्दी कमी होईल. प्रत्येक तालुक्यात साधारण चार ते पाच एजन्सीकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीवरील ताण आधीच वाढलेला असताना सवलतीच्या कार्डासाठी ज्येष्ठ नागरिकांना उन्हात उभे राहण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने लवकर उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी