
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १८ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून, प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात १८ मार्च रोजी दुपारी २:०० वाजता ही विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य मतदानाद्वारे नवीन अध्यक्षांची निवड करतील. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या निवड प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने यांची नियुक्ती केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी विविध पक्षांनी आपल्या सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू केली असून, काहींनी तर सदस्यांना सहलीवर पाठवण्याची तयारीही केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. १८ मार्च रोजी दुपारी होणाऱ्या य सभेत प्रत्यक्ष मतदानानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा कोणाच्या हाती जाते, हे स्पष्ट होईल. अध्यक्ष पदासाठी नामांकन पत्र सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जातील. सभेसाठी एकूण सदस्यांच्या १/३ गणपूर्ती असणे आवश्यक आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis