
अमरावती, 05 मार्च (हिं.स.) डिसेंबरपर्यंतच सुरू राहणारी शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्यापही ढकलली जात आहे. या समायोजनेच्या प्रक्रियेत अनेक त्रुट्या असून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्याकडे तक्रार दिली आहे. शासननिर्णयातील मुद्दा क्रमांक आठनुसार शिक्षकांच्या समायोजनेपूर्वी जिल्हास्तरावरून ३१ जुलैपर्यंत पदोन्नतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता जिल्हा परिषद प्रशासनाकडून सरळ समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय जि. प. व्यवस्थापनाच्या १०० टक्के शाळांची २०२५-२६ ची संचमान्यता प्राप्त नसतानाही समायोजनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, २०२५ मधील समानीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये, अशी सूचना असतानासुद्धा रिक्त पदे असताना ती न भरता जिल्हास्तरासाठी पात्र ठरविण्यात आल्याने शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. यासर्व मुद्द्यांची चौकशी करून विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून ही प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी