पश्चिम आशियातील तणाव चिंताजन – राजनाथ सिंह
कोलकाता, 06 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशिया खंडात सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका, इस्त्रायल आणि ईराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सध्या परिस्थ
राजनाथ सिंह संरक्षण मंत्री


कोलकाता, 06 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशिया खंडात सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका, इस्त्रायल आणि ईराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सध्या परिस्थिती असामान्य असून पुढे काय घडेल हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी राजनाथ सिंह यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर भाष्य करताना इशारा दिला की होर्मुझ सामुद्रधुनी या महत्त्वाच्या समुद्री मार्गात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जागतिक अर्थव्यवस्था तसेच तेल-गॅस पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच पर्शियन आखात परिसरातील अस्थिरता भारतासह संपूर्ण जगाच्या ऊर्जा सुरक्षेला थेट प्रभावित करू शकते. त्यांनी आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि अवकाशापर्यंत वाढत चाललेली स्पर्धा ही भविष्यासाठी मोठी आव्हाने असल्याचेही नमूद केले. होर्मुझ सामुद्रधुनी आणि संपूर्ण पर्शियन आखात परिसर जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागात कोणतीही अडचण निर्माण झाली तर तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होतो. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापारावरही होत असल्याचे राजनाथ यांनी सांगितले.

वर्तमानातील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. जमीन, हवा, समुद्र यांसोबतच आता अंतराळातही देशांमधील स्पर्धा वाढत आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची अस्थिर परिस्थिती भविष्यात “नवीन सामान्य” (न्यू नॉर्मल) बनू नये, हीच सर्वात मोठी चिंता असल्याचेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande