
मुंबई, 06 मार्च (हिं.स.) : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी याचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अभिनंदन केले आहे.
प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन अशा चार स्तंभांवर विकसित महाराष्ट्र २०४७ ची उभारणी होणार असून एक निश्चित अशी विकासाची दिशा आता मिळाली आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय म्हणजे महायुती सरकाराचा मास्टरस्ट्रोक आहे असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार कायम ठामपणे उभे आहे हे यातून सिद्ध होते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे तसेच नियमित कर्ज परतफेड केली असल्यास ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल याची मला खात्री वाटते.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा विरोधकांनी अपप्रचार चालवला होता. मात्र अर्थसंकल्पात आम्ही या योजनेसाठी तरतूद करण्याचे स्पष्ट केल्याने ही योजना आम्ही अधिक चांगली राबवून महिलांचे सक्षमीकरण करणार आहोत असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी भागांना व्यवस्थित जोडण्यासाठी अत्यंत सुयोग्य पद्धतीचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. यामध्ये रस्ते, मेट्रो, जलमार्ग, तसेच राज्यातील विविध विमानतळ यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटनासाठी पोषक असे राज्य बनविण्याचे उद्दिष्ट्य महायुती सरकारने समोर ठेवले आहे. मुंबई महानगरातील २० लाख झोपडीधारकांच्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी भाडे तत्वावरील घरांसह १० लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. एकीकडे आर्थिक शिस्त लावतांना दुसरीकडे एआय आधारित शेतीचा मजबूत पाया रचून कृषी क्षेत्राला नवे दिवस दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, त्याचप्रमाणे एकूणच विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सहज सुलभ आणि सुखी करण्याकडे ठोस पावलं उचलणारा हा अर्थसंकल्प आहे असेही ते म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त जनकल्याणाचे उपक्रमही राज्यात हाती घेण्यात येणार आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती आणि नियोजन लवकरच जाहीर करण्यात येत आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील नागरिकांना शासकीय योजना, सेवा सहजपणे, सुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्यासाठी तशी यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासनातली ७५ हजार रिक्त पदेही भरण्यात येणार असल्याने युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.
हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा आणि अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारून त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्याच्या निर्णयामुळे देखील योग्य संदेश जाईल असेही ते म्हणाले.
पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रात मोठा वाव आहे. त्यादृष्टीने छोट्या छोट्या पर्यटन स्थळांचा विकास करून ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना देणे, रोजगार वाढविणे शक्य होणार आहे. उद्योग क्षेत्राचे उत्पादन दीड हजार अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य ठेवतांना त्यासाठी विविध धोरणे जाहीर करून सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाला देखील प्रोत्साहन देण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात केले आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई उभारून एकूणच मुंबई महानगराला आणखी शक्तीशाली करण्याचा या अर्थसंकल्पात निर्धार व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर्स करण्याचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट्य आहे आणि यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे असणार आहे, याचे सुतोवाच करणारा हा अर्थसंकल्प आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी