सुखोई विमान अपघात : नागपूरचे फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हुतात्मा
नागपूर, 06 मार्च (हिं.स.) : आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात 5 मार्चच्या रात्री हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यात नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज हे द
फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर


नागपूर, 06 मार्च (हिं.स.) : आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात 5 मार्चच्या रात्री हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यात नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज हे दोन्ही शूर वैमानिक हुतात्मा झाले.

यासंदर्भात हवाई दलाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान हे विमान आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि डोंगराळ भागावरून जात असताना अचानक रडारवरून गायब झाले. काही वेळातच विमानाचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात यश आले नाही. हुतात्मा फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील शाहपूर येथील डीएसए अकादमीमध्ये आपले लष्करी पूर्व-प्रशिक्षण पूर्ण केले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी ते भारतीय हवाई दलातून पास आऊट झाले होते. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेमुळे संपूर्ण विदर्भासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत दोन्ही वैमानिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की,

सुखोई विमान अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. राष्ट्रसेवेसाठी त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि धाडस भारतीय वायुदलाच्या सर्वोच्च परंपरेचे प्रतीक आहे. देश त्यांच्या बलिदानाला सलाम करतो असे म्हणत गडकरी यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करत या कठीण काळात संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांसोबत उभा असल्याचेही म्हंटले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande