यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम
नवी दिल्ली, 06 मार्च (हिं.स.)। संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सिव्हिल सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर केला. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या पाठोपाठ
UPSC Civil Services Exam Final Result Declared


नवी दिल्ली, 06 मार्च (हिं.स.)। संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सिव्हिल सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर केला. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा तर आकांक्षा धूल यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. निकाल जाहीर होताच देशभरातील यशस्वी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वर्षी एकूण ९५८ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १८० उमेदवारांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेसाठी करण्यात आली असून ५५ उमेदवार भारतीय परराष्ट्र सेवेसाठी तर १५० उमेदवार भारतीय पोलिस सेवेसाठी निवडले गेले आहेत. उर्वरित उमेदवारांची नियुक्ती इतर केंद्रीय सेवांमध्ये करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या निकालात अव्वल दहामध्ये अनुज अग्निहोत्री, राजेश्वरी सुवे एम आणि आकांक्षा धूल यांच्यासह राघव झुनझुनवाला, ईशान भटनागर, जीनिया अरोरा, ए. आर. राजा मोहद्दीन, पक्षल सेक्रेटरी, आस्था जैन आणि उज्जवल प्रियांक यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर देशपातळीवरील या कठीण स्पर्धेत यश मिळवले आहे.

सिव्हिल सेवा परीक्षेची प्राथमिक परीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडली. अंतिम टप्पा असलेली व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखत प्रक्रिया ५ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली होती आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ती पूर्ण झाली. मुख्य परीक्षेनंतर एकूण २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.

भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवडलेल्या १८० पदांपैकी ७४ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी आहेत. तसेच २८ पदे अनुसूचित जाती, १३ पदे अनुसूचित जमाती, ४७ पदे इतर मागासवर्गीय आणि १८ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. कठोर अभ्यास, संयम आणि सातत्य यामुळेच या परीक्षेत यश मिळते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत सर्व उमेदवारांचे गुण आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande