अजित पवारांचे भव्य स्मारक उभारणार, गतिमान नागरी सेवा पुरस्काराची घोषणा
मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अर्थ खात्यावर असलेली पकड, त्यांनी राज्याला लावलेली आर्थिक शिस्त असा विशेष उल्लेख केला. तसेच अजित पवारांना श्रद्धांजली
अर्थसंकल्प फडणवीस अजित पवार


मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अर्थ खात्यावर असलेली पकड, त्यांनी राज्याला लावलेली आर्थिक शिस्त असा विशेष उल्लेख केला. तसेच अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून सगळ्या मान्यवरांशी चर्चा करुन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक उभारण्यात येईल. सोबतच त्यांच्या नावानं गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल, अशा दोन मोठ्या घोषणा देखील यावेळी करण्यात आल्या. हा अर्थसंकल्प अजित दादांच्या स्मृतींना समर्पित करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, भाषण करताना मन जड झालं आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घ काळ वित्त मंत्रालयाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्याला, आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर बारामतीमधील विमानतळावर असलेल्या गैरसोयी, नाईट लँडिंगची नसलेली सुविधा यांची बरीच चर्चा झाली. फडणवीस यांनी बारामतीत रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा उभारण्याची घोषणा केली आहे. नाईट लँडिंगच्या सुविधा असल्यास धुक्याच्या परिस्थितीत विमान सुरक्षित लँड करता येतं. त्यामुळे संभाव्य अपघात, दुर्घटना टाळता येतील.

अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांचे राज्याच्या अर्थकारणातील योगदान अधोरेखित केले. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते. त्यांनी विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती. अजित पवार हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि कामाच्या गतीसाठी ओळखले जायचे. त्यांच्या याच गतिमान कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्यासाठी हा नवीन पुरस्कार दिला जाणार आहे. या घोषणेनंतर उपस्थित सदस्यांनी सभागृहाने बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande